नगर – मनुष्यावर आलेल्या संकटाच्या काळामध्ये नगरकरांनी नेहमीच पुढे येऊन माणुसकीची भावना दाखविली आहे. करोनाच्या काळामध्ये शहरातील विविध संघटनांनी व युवक पुढाकार घेत काम करत आहेत. यामध्ये गुरू आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेद कॉलेज व बडी साजन मंगल कार्यालय येथे सुमारे 150 बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे. गुरुआनंद कोविड सेंटरच्यावतीने जनतेसाठी स्त्रव (आरटीपीसीआर) चाचणी केंद्र सुरु केले आहे.
या माध्यमातून शहरातील नागरिकांची गैरसोय होणार नाही. करोना संसर्ग विषाणूला हद्दपार करण्यासाठी एकीची गरज आहे. एकमेकांना मदतीचा हात देऊन करोना रुग्णांना बरे करणे, आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
गुरु आनंद कोविड सेंटरच्यावतीने बडी साजन मंगल कार्यालय येथे स्त्रव (आरटीपीसीआर) चाचणी केंद्राचा प्रारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जैन कॉन्फरेन्स युवक अध्यक्ष धनेश कोठारी, मर्चंट बॅकेचे संचालक कमलेश भंडारी, अमित मुथा, रोशन चोरडिया, पंकज खंडेलवाल, अमित आनेचा आदी उपस्थित होते.
यावेळी धनेश कोठारी म्हणाले, आम्ही सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. करोना संकटामुळे मनुष्य घाबरला आहे. या संकटाच्या काळामध्ये त्याला धीर देणे आपले कर्तव्य आहे. आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व युवक शहरामध्ये कोविड रुग्णांची सेवा करण्याचे काम करत आहे.
दोन कोविड सेंटर सुरु करून कोविड रुग्णांना दिलासा देण्याचे काम करत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून स्त्रव चाचणी केंद्र अल्प दरात सुरू करुन नागरिकांची होणारी गैरसोय नक्कीच या माध्यमातून कमी होईल.