पुणे – तरुणाला “गे चॅट’ ऍपवरून भेटण्यास बोलावत त्याला लुटणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. जतीन संतोष पवार (18, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तक्रारदार यांचा विवाह झाला आहे. त्यांना 9 ऑगस्ट रोजी “गे चॅट’ ऍपवर रवी नावाच्या मुलाने रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू होते. रवीने फिर्यादीला पत्ता देऊन नांदेड फाटा परिसरातील एका खोलीवर बोलाविले.
त्याठिकाणी रवी व फिर्यादी तरुणाची भेट झाली. यावेळी तेथे तिघे दाखल होत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे लॉकेट असा 81 हजार रुपयांचा ऐवज लुटला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. युनिट एकचे सचिन जाधव यांना मुख्य आरोपी जतीन पवार हा बिबवेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी सचिन जाधव, प्रशांत गायकवाड, बाबा चव्हाण यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. आरोपीचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तो मिळेल ते काम करतो, असे पोलिसांनी सांगितले.