चित्रकाराचे प्राण

माणूस माणसाला जिवंतपणी आनंद देत नाही. परंतु एखादा माणूस आजारी पडल्यावर त्याच्या मागे धाव घेतो. एखादी व्यक्‍ती हॉस्पिटलमध्ये असेल तेव्हा तिच्यासाठी फळफळावर घेऊन जातो. एखाद्याची अंतिम यात्रा निघाली असेल तर हातातली सगळी कामे बाजूला टाकून, सुट्टी काढून, वेळात वेळ काढून उपस्थित राहतो. आपल्या अंत्ययात्रेला कोण उपस्थित आहे, कोण उपस्थित नाही हे इहलोकीची यात्रा सोडून जाणाऱ्या माणसाला कळत नसतंच. चार मित्र आपल्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिले म्हणून मृत माणसाला आनंद वाटत नाही. दोन सगेसोयरे आले नाहीत म्हणून दुःख वाटत नाही. इहलोकीच्या यात्रेला निघालेला माणूस या अशा सगळ्या जाणिवांच्या पलीकडे पोहचलेला असतो.

“अचेतन देहाला कोणत्याही जाणिवा उरलेल्या नसतात’, याची जित्याजागत्या माणसाला पूर्ण जाणीव असते. तरीही जिवंतपणी एखाद्याच्या सुखाची पर्वा न करणारा माणूस अशा ठिकाणी का उपस्थित राहत असेल? मला वाटतं त्याला त्याच्या कर्तव्यपूर्तीच्या सुखाची अनुभूती घ्यायची असते. अल्फ्रेड हा एक अमेरिकन चित्रकार. तो अप्रतिम चित्रे काढायचा. एकदा त्याच्या मनात आलं. प्रदर्शनात आपल्या कलेची वाहवा करणारे रसिक आपलं चित्र विकत घेतील का? त्याने परीक्षा घ्यायची ठरवलं. एक अप्रतिम चित्र घेऊन तो शहराच्या मध्यवर्ती भागात विकायला बसला. चित्राची किंमत केवळ दोन डॉलर ठेवली. लोक यायचे. थांबायचे. बघायचे. छान, सुंदर, अप्रतिम अशा शब्दात कौतुक करायचे. सुखावल्या डोळ्यांनी, तृप्त मनाने पुढे जायचे. चित्रकार मोठ्या आशेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे बघत होता. पण कोणीही ते चित्र विकत घेईना.

असेच चार दिवस गेले. चित्रकार रोज तिथे यायचा. तासन्‌तास बसायचा. कोणीतरी आपलं चित्रं विकत घेईल म्हणून वाट बघायचा. पण खिशातून पैसे काढून ते चित्रं विकत घेण्याचा मोठेपणा कोणी दाखवत नव्हतं. अनेकजण चित्र पाहून पुढे जायचे. शेजारच्या बारमध्ये जायचे. झिंगत बाहेर यायचे. सिगारेटच्या धुराची वलये सोडत चित्रकाराच्या समोरून डुलत डुलत पुढे जायचे. कोणी सहकुटुंब यायचे, चित्रं पाहायचे. त्यांचे डोळे तृप्त व्हायचे. चित्रकाराचं कौतुक करताना त्यांच्या मुखातून शब्द ओसंडून वाहायचे. पण खिशात हात न घालता ते कुटुंब पुढे निघून जायचं. कोपऱ्यावरील रेस्टोरंटमध्ये शिरायचं. तिथल्या गल्ल्यावर खिसा रिकामा करायचं. जातना, चित्रं अजूनही विकलं गेलं नाही म्हणून दुःखी झालेला चित्रकार त्यांना दिसायचा. पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे.

आठ दिवस गेले. खरंतर ज्याने चित्रं विकत घेतलं असतं त्याला चित्रकाराच्या चित्राने आनंदच दिला असता. त्या व्यक्‍तीच्या संग्रही ते चित्र राहिलं असतं. पण कोणीही ते चित्र विकत घेत नव्हतं. कारण त्यातून फारसा फायदा नव्हता. कौतुक करताना शब्द विकत घ्यावे लागत नव्हते. चित्रकाराला वाटलं आपल्या चित्रातच काहीतरी उणीव असावी. म्हणून मग त्याने त्याचे कपडे फाडले. त्या चित्रावर चिटकवले. जाणाऱ्या येणाऱ्यांनी वाहवा केली. चित्रातील खरेपणा बघून हरखून गेले. चित्रकाराला वाटलं चित्राच्या डोक्‍यावरील केस वास्तववादी वाटत नसावेत. म्हणून मग त्याने स्वतःचे केस उपटले. त्या चित्रावर चिटकवले. चित्रकाराला टक्‍कल पडलं. जाणारे येणारे चित्राचं कौतुक करत राहिले. पण चित्र विकत घेण्याची दानत कोणी दाखवेना. आता तर उन्हामुळे चित्रकाराचा चेहरा काळवंडू लागला होता. आणि चित्रातले रंगदेखील उडू लागले होते. चित्र बघणाऱ्यांच्या नजरेतलं कौतुकदेखील गढूळ झालं होतं. एकदिवस चित्रकाराने त्याची कातडी सोलली आणि त्या चित्रावर चिटकवली. चित्र बघणारे चित्रातली वास्तवता बघून अचंबित झाले. चित्रकाराशी हस्तांदोलन करू लागले. त्यांची नजर चित्राच्या कौतुकात हरवून गेलेली असायची. पण चित्रकाराच्या हातावरच्या जख्मा त्यांना दिसत नव्हत्या. तर चित्र विकलं जात नसल्यामुळे चित्रकाराला मनाला होणाऱ्या जख्मा कोणाला दिसणार?

दिवस जात होते. कौतुकाच्या पलीकडे चित्रकाराच्या ओंजळीत काहीही पडत नव्हतं. चित्रं आणखी खरंखुरं वाटावं यासाठी काय करावं हे चित्रकाराला कळत नव्हतं. चित्रकाराने त्याच्या अंगावरच्या कपड्यांची लक्‍तरं करून चित्रं सजवलं होतं. आपल्याला टक्‍कल पडेल याची पर्वा न करता स्वतःचे केस उपसून चित्राला चिटकवले होते. कर्णाने कवचकुंडल दान करावीत तशी त्याने त्याची त्वचा सोलून चित्रावर चिटकवली होती. आणखी काय उणीव उरली आहे चित्रात. दोष चित्रात आहे की बघणाऱ्याच्या दृष्टीत.

अल्फ्रेड स्वतःशीच विचार करत होता. रसिकांच्या दृष्टीला दोष देणे त्याला पटेना. दृष्टी आणि दोष या दोन्ही शब्दांचा तोल सांभाळताना त्याला वाटलं, “आपल्या चित्रातले डोळे हूबेहूब दिसत नसावेत.’ परंतु डोळे हुबेहूब दिसावेत म्हणून काय करावं हे अल्फ्रेडला कळत नव्हतं. अल्फ्रेड वैतागून गेला. आपल्या चित्राकडे आपण बघूच नये असं त्याला वाटलं. हे डोळे काढून फेकून द्यावेत.’ असे विचार चित्रकाराच्या मनात आले. त्या विचारसरशी चित्रकाराचे डोळे चमकले. त्याने स्वतःचे डोळे काढले. चित्रात चिटकवले.

एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात चित्र घेऊन चित्रकार चित्र विकण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उभा राहिला. जाणारे येणारे कौतुक करत होते. डोळे तर अगदीच खरेखुरे वाटत आहेत ना, असे म्हणत होते. चित्रातल्या डोळ्यांचा खरेपणा बघणाऱ्याला जाणवत होता पण अल्फ्रेडचं अंधत्वाची कोणीही दखल घेत नव्हतं. अल्फ्रेड निराश झाला. “शब्दांचे बुडबुडे हीच का कलेची किंमत’ अशा विचाराने मनोमन खंगू लागला. आजारी पडला. चित्रकार आजारी पडल्याची आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची बातमी गावात पसरली. चित्रकाराची गरिबी बघून मदतीचा ओघ सुरू झाला. पण ती मदत कमी आली नाही. शेवटचा श्‍वास घेताना चित्रकार एवढंच म्हणाला, “मला वाचविण्याचा प्रयत्न करू नका. माझे प्राण माझ्या कलाकृतीत ओतले आहे. ती कलाकृती तेवढी विकत घ्या.’

– विजय शेंडगे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.