उत्तर प्रदेश – ‘द केरळ स्टोरी’ 5 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला मोठा प्रतिसादही मिळत आहे. काही राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही ‘द केरळ स्टोरी’ करमुक्त केला जाणार आहे.
‘उत्तर प्रदेश सरकार ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट राज्यात करमुक्त घोषित करेल’, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह लोक भवन येथे होणाऱ्या विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात.
यूपी भाजपचे सचिव राघवेंद्र मिश्रा यांनी नुकताच लखनऊमध्ये 100 विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवला आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करणारे उत्तर प्रदेश हे दुसरे राज्य ठरले आहे. तर मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे. मात्र तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. याशिवाय ममता बॅनर्जींनी आदेश दिल्याने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ‘द केरळ स्टोरी’ वर बंदी घालण्यात आली आहे.
‘The Kerala Story’ उत्तर प्रदेश में टैक्स फ्री की जाएगी।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 9, 2023
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बेल्लारी येथील सभेत ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर भाष्य केले होते. केरळ भारताचे एक सुंदर राज्य आहे. पण तिथे छुप्या पद्धतीने कसा दहशतवादी कट रचला जात होता हे संपूर्ण जग पाहत असल्याचे म्हणत त्यांनी या चित्रपटाचे समर्थन केले होते.