कोल्हापूरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानेच चोरले मूर्तीवरील दागिने

कोल्हापूर – कोल्हापूरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीच्या अंगावरील दागिने मंडळाच्या कार्यकर्त्यांने चोरी केली होती, हे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सुयश उर्फ वरुण महेश हुक्केरी (वय 19 रा. राजाराम चौक) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन चांदीचे कंडे, चार अंगठ्या, असा 1381 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले.

दिनांक 15 सप्टेंबर रोजी पहाटे 3 ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राजाराम चौकातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरीस गेले होते. यावेळी मंडपात काही कार्यकर्ते झोपले होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मूर्तीच्या अंगावरील चार अंगठ्या, दोन कंडे चोरीस गेल्याची फिर्याद दिली.

या गुन्हाचा तपास करताना पोलिसांना सुयश हुक्केरीने दागिने चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.