Prakash Solanke : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या गाड्यांची देखील जाळपोळ करण्यात आली आहे. सुदैवाने आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे. या दगडफेकीमध्ये घरासह गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर ते समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माजलगावचे राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले आणि त्यांनी सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक आणि जाळपोळ केल्याचे म्हंटले जात आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्याचे दिसते. यावेळी काही तरूणांनी गेट तोडून प्रकाश सोळंके यांच्या घरात प्रवेश केला. घराच्या काचा फोडल्या. तसेच पार्किंगमधील तीन ते चार गाड्या फोडल्या आणि त्या पेटवून देण्यात आला. पोलिसांकडून जमावाला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अपयशी ठरला. जवळपास हजारापेक्षा जास्त मराठा समाजबांधव घराभोवती जमले होते.
प्रकाश सोळंके काय म्हणाले?
या घटनेनंतर प्रकाश सोळंके यांनी एक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. “या घटने दरम्यान मी माजलगावमध्ये घरातच होतो. काही आंदोलक माझ्या घरी आले, त्यांच्याशी मी बोलायचा प्रयत्न केला पण कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर अचानक त्यांनी दगडफेक सुरु केली, यामध्ये माझ्या घराचं नुकसान झालं आहे, घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. मी मराठा समाजाचा आमदार आहे, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. कोणीतरी अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे.