पुणे – अपघातामध्ये (Accident) संपूर्ण हात गमावलेल्या हेल्परचे जगणे अवघड बनले. उदरनिर्वाह करणेही मुश्कील बनले होते. या परिस्थितीतील असंघटीत कामगार असणाऱ्या हेल्परला तब्बल 10 वर्षांच्या न्यायालयीन (Court) लढ्यानंतर यश आले आहे. 31 लाख 69 हजार 700 रुपये दावा दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक 9 टक्के व्याजाने देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य बी.पी.क्षीरसागर यांनी दिला आहे. व्याजासह ही रक्कम 57 लाख रुपये होत आहे. (Pune news)
लवळे (ता. मुळशी) येथील 32 वर्षीय हेल्पर दुचाकीवरून कंपनीत कामाला चालला होता. त्यावेळी 13 मे 2013 रोजी समोरून आलेल्या टेम्पोने पिरंगुट येथे धडक दिली. त्यामध्ये त्याच्या उजव्या हाताचा चुराडा झाला. उजवा हात कोपऱ्यापासून काढावा लागला. त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले. त्याने ऍड. शशिकांत एम.बागमार, ऍड. निनाद एस.बागमार आणि ऍड. केतन मंडलेचा यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला.
टेम्पोचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात (Bajaj Allianz General Insurance Company) 2014 मध्ये हा दावा दाखल करण्यात आला होता. त्याला दरमहा 9 हजार रुपये पगार होता. भोगाव्या लागलेल्या वेदना आणि कायमस्वरूपी आलेल्या अपंगत्वामुळे भविष्यात हेल्पर म्हणून काम करणे शक्य नाही. त्यामुळे अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली.
ऍड. बागमार यांनी उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि तो काम करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाची साक्ष न्यायलयात नोंदविली. ही साक्ष आणि युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यान सामान्य हेल्पर व्यक्तीला न्याय मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले.
एक हात गमाविल्यामुळे हेल्परचे काम करणे शक्य नाही. पर्यायाने उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशाने मिळालेली ही मदत महत्त्वपूर्ण आहे.
– ऍड. केतन मंडलेचा, अर्जदाराचे वकील.