नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हरियाणामध्ये रात्री उशिरा 1:19 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, झज्जरचे बेरी हे भूकंपाचे केंद्र होते. रिश्टर स्केलवर ज्याची तीव्रता 3.8 होती. महेंद्रगड-डेहराडून फॉल्ट लाईनजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
संपूर्ण देश नव्या वर्षाच्या आगमनात बुडालेला असताना झज्जर-रोहतक आणि आसपासच्या भागातील लोकांना रात्री 01:19 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसल्याने नवीन वर्ष साजरे करणारे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.अद्याप कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
जमिनीच्या खाली फक्त 5 किलोमीटर अंतरावर या भूकंपाची नोंद झाली, त्यामुळे अनेकांना हा भूकंप जाणवला. रोहतक-झज्जरमधून जाणाऱ्या महेंद्रगड-डेहराडून फॉल्ट लाईनजवळ अनेकदा भूकंप होतात. ज्यावर नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीही थेट लक्ष ठेवून असते. अशात नवीन वर्ष सुरु होताच तासाभरात हे धक्के जाणवल्याने समोर आले आहे.