मुंबई – मराठी नवं वर्षाच्या स्वागताला राज ठाकरे यांचं भाषण चांगलं गाजलं. त्याच्या आवाजाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागत आहे. मागल्या काही दिवसांपासून लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतं आहे. ह्यात राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावणार असून या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून आज वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, लाऊडस्पीकरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहोत. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन 2015 आणि 2017 मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.