पुणे, दि. 30 -नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाला शुक्रवारी पावसाचा तडाखा बसला. ही नवीन इमारत पर्यावरणपूरक बांधल्याने तेथे हवा खेळती राहण्यासाठी जाग सोडण्यात आली आहे. मात्र, वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने या वाऱ्याने या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील पार्किंग ते या मजल्यांना जोडणाऱ्या पॅसेजचे सिलिंग पॅनेल जोरदार वाऱ्याने उडून गेले. त्याचे काही तुकडे इमारतीखाली उभे असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर पडल्याने गाडीची मागील बाजूची काच फुटली.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुरू झालेल्या पावसासोबत जोरदार वाराही होता. हा वेग इतका होता, की इमारतीत हवा येण्यासाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून वारा आत येत होता. या वेगाने अखेर हे सिलिंग उडून गेले. हे सगळे सिलिंगचे पॅनेल कागदासारखे या इमारतीच्या पॅसेजमध्ये उडत होते. दरम्यान, वाऱ्याचा अवतार पाहून वेळीच या इमारतीच्या पॅसेजमध्ये असलेले नागरिक आडोशाला गेल्याने अप्रिय घटना घडली नाही.