पुलावर 1300 होल्स घेण्यात आले आहेत
600 किलोची स्फोटके वापरणार
दगड उडू नयेत यासाठी 6500 चौरसमीटर चेन लिंक
धुळ पसरु नये यासाठी 7500 चौरसमीटर इतके विशिष्ट कापड
पुणे, दि.30 – चांदणी चौकात सध्या अस्तित्वात असलेला पूल रविवारी (दि. 2 ऑक्टोंबर) पहाटे दोन वाजता पाडण्यात येणार आहे. हा पूल अवघ्या पाच सेंकदात पाडला जाणार आहे. यासाठी नोएडा येथील ट्विन टॉवर पाडणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या पुलाच्या 200 मीटर परिघातील तीन इमारती खाली करण्यास सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने महामार्ग प्राधिकरणाने संबंधितांना नोटीसा पाठविल्या आहेत. हा परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे. पूल पाडण्याच्या पूर्वतयारीसाठी आणि राडारोडा उचलण्यासाठी शनिवारी (दि.1) रात्री 11 ते रविवारी (दि.2) सकाळी आठपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.
हौशांना, बघ्यांना रोखणार…
पूल मध्यरात्री दोन वाजता पाडण्यात येणार असला तरीही, हौशी बघ्यांची गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून अटकाव केला जाणार आहे. महामार्गावरील वाहतूक ठिकठिकाणावरून शहरातून वळविण्यात येणार आहे. तसेच, महामार्गावर वारजे आणि बावधन येथे, तर कोथरूड डेपो येथून पुढे नागरिकांना किंवा खासगी वाहनांना चांदणी चौकाकडे जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.
पावसाचा परिणाम नाही…
शहरात गेली दोन दिवस पाऊस पडत आहे. मात्र, पुलाच्या पाडकामात पावसाचा कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. पुलाला छिद्र पाडून त्यात जिलेटिनच्या कांड्या टाकण्यात आल्या आहेत. या पुलाच्या सर्व भागाला जाळी आणि कापडाने झाकण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचा त्यावर काही परिणाम होणार नसल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.
राडारोडा सफाईचे मोठे काम…
पूल पाडल्यानंतर सर्वात मोठे आव्हान हे राडारोडा उचलून महामार्ग साफ करून वाहतूक सुरळीत करणे आहे. रात्री दोन वाजता पूल पाडल्यानंतर अर्धा तासाने एक पथक खात्री करले. त्यानंतर राडारोडा उचलण्याचे काम प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. यासाठी चार डोझर, आठ पोकलेन, 30 टिपर आणि 100 पेक्षा जास्त कामगार अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कमी वेळात राडारोडा उचलण्याचे नियोजन केले जाणार आहे.