पुणे, दि. 30 -शहर-उपनगरांत शुक्रवारी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. यात शहरात पावसाने शहर-उपनगरांत झाडपडीच्या 66 घटना घडल्या. शिवाय, रस्ते पाण्यात गेल्याने पुणेकरांना मनस्ताप झाला.
झाडपडीच्या घटना प्रामुख्याने सेनापटी बापट रस्ता, भांडारकररस्ता, इंदिरानगर, पु.ल देशपांडे उद्यान, सिंचन भवन, दत्तवाडी, येरवडा, विश्रांतवाडी, कोथरूड, घोले रस्ता, हडपसर, कोंढवा,कर्वेनगर, सिंहगड रस्ता, एरंडवणे या भागांत घडल्या. मुख्य रस्त्यांवर ही झाडे पडल्याने तसेच त्याखाली वाहने अडकल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तर येरवडा येथील रामनगरमध्ये एका रिक्षावर झाड पडल्याची घटना घडली असून यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. तर भवानीपेठ टिंबर मार्केट येथेही एका बैलाच्या अंगावर झाड पडले होते. दोन्ही ठिकाणी अग्निशमनदलाने तत्काळ झाड बाजूला काढत मदत केली. दुपारी साडेचार ते साडेपाच अशी तासभर हजेरी लावलेला पाऊस काही तास थांबला. त्यानंतर पुन्हा साडेआठ वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली.
आदित्य ठाकरेंनी नियोजन बदलले
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता येरवडा येथील शिवसेनेचे माजी गटनेते संजय भोसले यांच्या देवीच्या नवरात्र उत्सव मंडळाला भेट देणार होते. मात्र, पाऊस आणि त्याचा फटका वाहतुकीला बसला. कोंडीतून बाहेरच पडता येत नसल्याने त्यांनी मार्ग बदलत सारसबाग महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. त्यानंतर येरवडा येथे रात्री साडेदहा वाजता दर्शन घेतले.
रस्ते, की तळी?
कर्वेरस्ता, जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी, रस्ता, बाजीराव रस्ता, पेठांमधील अंतर्गत रस्ते, नगररस्ता, विद्यापीठ रस्ता, सेनापती बापट रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, पुणे स्टेशन रस्ता, सिंहगड रस्त्याला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले होते. तर अचानक पाऊस सुरू असल्याने अनेक वाहन चालकांनी रस्त्याच्या कडेला वाहने लावली. मात्र, पाण्याला जाण्यास जागाच नसल्याचे तसेच ड्रेनेजची झाकणेही पाण्याने उसळून येत असल्याने वाहनांचेही नुकसान झाले.