बारामती/ जळोची -करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सांत्वनासाठी आलेल्या विवाहित मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना जळोची येथे घडली. दुर्देवी घटनेमुळे जळोची परिसरात शोककळा पसरली.
बारामतीतील जळोची गावात राहणाऱ्या ढाळे कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला. काही दिवसांपूर्वी आईला करोनाची बाधा झाली. त्या उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. सांत्वनासाठी इंदापूर तालुक्यातील रेडणी गावातून आलेल्या मुलीचा (दि.22) विषारी साप चावून मृत्यू झाला.
या दुहेरी आघाताने ढाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच आई सरूबाई बंडा ढाळे यांचा करोनामुळे मृत्यू झाला. सांत्वनासाठी त्यांची मुलगी मनीषा ठोंबरे या जळोची गावात आल्या होत्या.
जळोचीतील या माहेरच्या घरी त्या झाडलोट करीत असताना त्यांच्या पायाला पिठाच्या गिरणीजवळील जागेतून डोकावणाऱ्या सापाने दंश केला. सापाची शेपटी मनीषा यांनी पाहिली. त्यानंतर घरातल्या सर्वांनी सापाचा शोध घेतला. मात्र, साप सापडला नाही.
मनीषा यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु सर्वत्र करोनाचे रुग्ण असल्याने तातडीचे उपचार होण्यास उशीर झाला. त्यांचा त्रास वाढला. उपचारादरम्यान (दि.22) सकाळी 10.30 वाजता मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांना जळोची येथून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. मनीषा यांना दहा वर्षाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मात्र ढाळे कुटुंबातील आणि ठोंबरे कुटुंबातील या दुर्देवी घटनेमुळे जळोची गावावर शोककळा पसरली होती.