- सात जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी – ड्रम नेल्याच्या किरकोळ कारणावरून सात जणांनी वाहनांची तोडफोड करीत एकावर कोयत्याने वार केले. संचारबंदी सुरू असतानाही टोळक्याने अशा प्रकारे धुमाकूळ घातल्याने बौद्धनगर, पिंपरी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (दि. 12) पहाटे दोनच्या सुमारास घडली.
छोटा रावण (वय 25), चांद (वय 22), ए जे (वय 22) आणि त्यांचे तीन ते चार साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल अभिमन्यु सोनवणे (वय 30, रा. बौद्धनगर, एमआयडीसी पिंपरी) यांनी सोमवारी (दि. 13) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी छोटा रावण याने फिर्यादी यांचा ड्रम नेला. याबाबत फिर्यादी यांनी त्याला विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या साथीदारांसह फिर्यादी यांना लाकडी दांडके आणि कोयत्याने मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घराजवळ असलेल्या दुचाकींचीही तोडफोड केली. “आम्ही इथले भाई आहोत, कोणी घराच्या बाहेर आला तर त्याला खल्लास करून टाकीन’ असा आरडा-ओरडा करत धुमाकूळ घातला.