निमिष गोखले
पुणे – मार्केट यार्डजवळील बहुचर्चित उड्डाणपूल मार्चअखेरीस पूर्णत्वास येईल, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. उड्डाणपुलाचे सुमारे 75 ते 80 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या पाच महिन्यांत पुणेकरांसाठी तो खुला करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. नेहरू रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या या दुहेरी उड्डाणपुलासाठी सुमारे 30 कोटींचा खर्च आला आहे. अप्सरा टॉकीज ते राज्य वखार महामंडळदरम्यान तो उभारण्यात येत असून तो खुला केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
सव्वा किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल असून 9 मीटर रुंद असेल. शंकरशेठ रस्ता व नेहरू रस्त्यांना हा उड्डाणपूल वरदान ठरणार आहे. डायस प्लॉट येथे सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. परिणामी, नागरिकांचा वेळ व पैसा नाहक खर्च होतो. दरम्यान, या उड्डाणपुलाची डेडलाइन जून 2021 होती. मात्र, विक्रमी वेळेत त्याचे काम पूर्ण होणार असून तब्बल तीन महिने आगोदरच तो नागरिकांसाठी खुला होईल, असा दावा महापालिका पथविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.
उड्डाणपूल गंगाधामपर्यंत हवा होता
मार्केट यार्डजवळील उड्डाणपूल गंगाधाम चौकापर्यंत न्यायला हवा होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. गंगाधाम चौकापर्यंत नेला असता तर तेथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असती. मात्र राज्य वखार महामंडळाच्या येथेच तो उतरविण्यात येत असल्याने गंगाधाम चौकात वाहनांची संख्या पूर्वीपेक्षा वाढेल, असे निरीक्षणही स्थानिकांनी नोंदविले. दरम्यान, महापालिकेकडून मार्केट यार्ड चौकात दुसरा उड्डाणपूल बांधण्याचे विचाराधीन आहे.
लॉकडाऊन काळात काम ठप्प, तरीही…
लॉकडाऊन काळात कामगार पुण्यातून आपल्या मूळगावी परतले. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम चार-पाच महिने ठप्प होते. गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी मात्र कामगार पुण्यात परतले असून काम झपाट्याने सुरू झाले आहे. परिणामी वाया गेलेले दिवस झपाट्याने भरून निघतील, असे दिसून येते. करोनामुळे उद्भवलेले लॉकडाऊन झाले नसते तर उड्डाणपूल डिसेंबरपर्यंत खुला झाला असता असेही पालिकेतील एका अधिकाऱ्याने दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले.