पुणे – रस्ते अपघातात जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी अवयवदानास परवानगी दिल्यामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले. त्यामध्ये सह्याद्री रूग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात हे अवयव प्रत्यारोपण झाले.
रस्ता अपघातात जखमी झालेल्या 52 वर्षीय महिलेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ती ब्रेन डेड झाल्यावर नातेवाईकांनी अवयवदानासाठी परवानगी दिली. त्यावेळी तिचे यकृत आणि दोन्ही किडनी दान करण्यात आले. हे तीनही अवयव गरज असलेल्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आल्याने तीन जणांचे जीव वाचले आहेत.
संबंधित महिलेच्या पतीचे अवयवदानाबाबत समुपदेशन केल्यावर त्यांनी अवयवदान करण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांची एक किडनी आणि यकृत प्रत्यारोपण सह्याद्री रुग्णालयातील गरजू रुग्णांना देण्यात आली. तर एक किडनी पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण टीमने दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना जीवदान दिले. अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली. पुणे ‘झेडटीसीसी’चे हे या वर्षीचे 13 वे अवयवदान होते. हे प्रत्यारोपण डॉ. बिपिन विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.