मुंबई – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेता केके गोस्वामीच्या कारला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून त्याचा 21 वर्षांचा मुलगा नवदीप थोडक्यात बचावला आहे. ही घटना काल रात्री शहराच्या मध्यभागी असलेल्या एसव्ही रोडवर घडली आहे. केके गोस्वामी यांचा मुलगा फिल्मिस्तान स्टुडिओजवळील त्याच्या घरातून त्याच्या वडिलांच्या कारने कॉलेजला जात होता. त्यावेळी या गाडीने अचानक पेट घेतला.
सुदैवाने अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे केके गोस्वामचा मुलगा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून तो सुखरूप आहे. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या कारला नेमकी आग कशी लागली याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, केके गोस्वामीचे खरे नाव कृष्णकांत गोस्वामी आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सुरुवातीच्या काळात मुंबईत आल्यानंतर त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. ‘शक्तिमान’ या मालिकांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्याने ‘गूटर गू’, ‘शका लका बूम बूम’, ‘सीआयडी’, ‘ज्युनियर जी’, ‘भाभी जी घर पर हैं’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकांमध्येही काम केले आहे.