पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एआयएसएसएमएसच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिट्री प्रायमरी डे स्कूल येथे वल्कन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने कथावाचन सत्राचे आयोजन करण्यात आले. अरविंद मित्तल यांनी या कथावाचन सत्राचे आयोजन केले. त्यांनी कथेसोबतच दैंनदिन जीवनातील वाचनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. इयत्ता तिसरी व पाचवीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
याप्रसंगी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत वल्कन टेक्नॉलॉजीतर्फे विविध कथांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी कथावाचन करून दाखवत सत्राची रंगत वाढवली. कथावाचन ही एक प्रकारची कलाच आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये ही कला रुजावी. याशिवाय वाचनाकडे त्यांची ओढ वाढावी, या दृष्टीने हे सत्र महत्त्वपूर्ण वाटते. एआयएसएसएमएस कायमच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणांचे संगोपन करत आले आहे व यापुढील काळातही हे जोपासले जाईल, अशी ग्वाही संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.
या कथावाचन सत्राच्या समारोपप्रसंगी शाळेच्या प्राचार्या शांती चरेजा यांच्या हस्ते अरविंद मित्तल, तसेच वल्कन टेक्नॉलॉजीचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी व वाचनसंस्कृती टिकून राहावी, या उद्देशाने या सत्राचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्या शांती चरेजा यांनी दिली.