नवी दिल्ली – अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर आली असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्यात वाहन कंपन्यांची विक्री वाढली. त्याचबरोबर कारखान्यातील काम वाढले असल्याचे मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय निर्देशांकांवरून दिसून येते.
ऑक्टोबर महिन्यातील पर्चेसिंग मॅनेजर्स इंटेक्स म्हणजे पीएमआय तब्बल 58.9 टक्के इतका मोजला गेला आहे. हा तेरा वर्षातील उच्चांक आहे. ऑक्टोबर महिन्यात मारुती सुझुकी आणि ह्युंदाई या कंपन्यांच्या विक्रीत 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.
होंडा कार्स, टोयोटा किर्लोस्कर, महिंद्राच्या विक्रीतही वाढ झाली. एमजी मोटर्सच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली. हिरो मोटोकॉर्प, या दुचाकी वाहन निर्मात्या कंपनीच्या विक्रीत तब्बल 34 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जीएसटी संकलन एक लाख कोटींवर
अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे आणखी एक चिन्ह म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलन 1.05 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जीएसटी संकलन कमी झाले होते. मात्र, त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात जीएसटीचे 95 हजार कोटी रुपयांचे संकलन झाले होते. त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात दहा टक्के वाढ झाली आहे. आता जीएसटी संकलन यापेक्षा कमी होणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्यांदरम्यानचा कर वाटपावरून होणारा तणाव कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्थमंत्रालयाने नुकसानभरपाईपोटी 16 राज्यांना आणखी 6 हजार कोटी रुपये जारी केले आहेत.