पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद होईल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यातील 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. आता सर्वांधिक 94 जागांसाठी मतदान होणार असल्याने दुसऱ्या टप्प्याचे महत्व वाढले आहे.
तेजस्वी यांच्याबरोबरच बिहारचे 4 मंत्री दुसऱ्या टप्प्यात निवडणूक रिंगणात आहेत. त्या टप्प्यात एकूण 1 हजार 463 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये 146 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यांचे भवितव्य 2 कोटी 85 लाख मतदार ठरवतील.
दुसऱ्या टप्प्यात विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणारा राजद सर्वांधिक 56 जागा लढवत आहे. राजदचा मित्रपक्ष कॉंग्रेसने 24 जागांवर उमेदवार दिले आहेत. सत्तारूढ एनडीएचे घटक असणारे भाजप आणि जेडीयू अनुक्रमे 46 आणि 43 जागा लढवत आहेत. एनडीएतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या लोजपने 52 जागांवर उमेदवार दिले आहेत.