पुणे – ढोल ताशांचा गजर… भव्य मिरवणुका… नागरिकांची प्रचंड गर्दी असे चित्र दरवर्षी गणरायांच्या आगमनाच्या दिवशी पाहायला मिळते. मात्र, करोनाच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर मंगलमय वातावरणात आणि पदाधिकारी, मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला.
“गणपती बाप्पा मोरया’, “मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात शुक्रवारी पाच मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना झाली. यावेळी उत्सव मंडपात विराजमान झालेल्या गणरायांसमोर चौघडा, सनई, शंख या पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. मानाच्या गणपती मंडळाचे उत्सव मंडपात फुलांसह आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
“करोनाचे विघ्न टळू दे’ अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यासह करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मंडळाची संकेतस्थळे आणि सोशल मीडियाद्वारे दर्शन घेण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11.38 वाजता खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाली. यावेळी सजविलेल्या पालखीतून परंपरेनुसार उत्सवमंडपापर्यंत “श्रीं’ची मूर्ती दाखल झाली. तर, पारंपरिक वाद्यांचे वादन झाले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी
मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11.30 वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी यांच्या हस्ते झाली. पारंपरिक पद्धतीने पालखीतून गणरायाची मूर्ती मंडपात दाखल झाली. यावेळी “विष्णूनाद’ पथकाचे शंख वादन, “न्यू गंधर्व’ बॅन्ड पथकाचे स्थिरवादन झाले.
मानाचा तिसरा श्री गुरूजी तालीम गणपती
मानाच्या तिसऱ्या श्री गुरूजी तालीम गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी 2.15 वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते झाली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नगरकर यांचे चौघडा वादन झाले. प्रातिनिधिक स्वरुपात ढोल ताशांचे स्थिरवादनदेखील बाप्पांसमोर झाले. तर आरतीच्या वेळी शंखांसह विविध पारंपरिक वाद्यांचे वादन झाले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी 12.30 वाजता व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते झाली. गणेशयाग, मंत्रजागर आदी धार्मिक विधी होणार आहेत.
मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती
मानाच्या पाचव्या श्री केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 10. 35 वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते झाली. यावेळी पालखीतून “श्रीं’ची मूर्ती केसरीवाड्यात आणण्यात आली.