विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे जिल्हा परिषदेच्या सीईओंनी काढले आदेश
राजगुरुनगर (पुणे) -खेड तालुक्यात 83 ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील आठ विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून पदभार स्विकारण्यास सुरुवात केल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत. करोना विषाणू संसर्ग पसरल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे ढकलल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया गेली अनेक दिवसांपासून खोळंबली होती. प्रशासक नक्की कोणाला नेमायचे यावरून राजकीय वातावरण तापले होते. मात्र शासनाने यावर मार्ग काढत आता पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासकांची जबाबदारी दिली आहे.
सरपंच आणि सदस्य पाय उतार झाल्याने प्रशासक जरी आले असले तरी याच गावकारभाऱ्यांना निदान आपल्या गावासांठी, नागरिकांसाठी कार्यरत राहण्याशिवाय पर्याय नाही. तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये करोना विषाणू संसर्ग पोहचला आहे, असे असताना गेली पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकारभारी शासन नियमांचे पालन करून करोना गावात येऊ नये म्हणून लक्ष ठेवून आहेत.
- अधिकाऱ्यांची गळचेपी, कामाचा बट्याबोळ
खेड तालुक्यात ग्रामपंचायतीवर नेमण्यात आलेल्या प्रशासकांना पंचायत समितीचा आपल्या विभागातील कामकाज सांभाळुन ग्रामपंचायतीना भेटी देणे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणासाठी अंतर आणि वेळेचा विचार करता दमछाक होणार आहे. प्रशासकांची गावनिहाय नियुक्ती करताना एकाच रस्त्यावर, अथवा एकाच परिसरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती देण्याऐवजी पूर्वेकडील काही गावे आणि पश्चिमेकडील काही गावे देऊन अधिकाऱ्यांची गळचेपी केल्याने कामांचा बट्याबोळ केल्याचे दिसून येत आहे.
- 83 ग्रामपंचायतींवर नियुक्त प्रशासक
1) एस.एन. महंकाळे – रानमळा, वडगाव पाटोळे, वेताळे, साबुर्डी, दोंदे, कडुस, कडधे
2) बाळासाहेब ओव्हाळ – कुरकुंडी, किवळे, चांदुस, तोरणे बु., चिबंळी, शेलु, पिंपरी बु., आसखेड खु., कोरेगाव बु., तळवडे, गोनवडी, बिरदवडी
3) एस. बी. कारंडे – चांडोली, कनेरसर, पाडळी, पांगरी, खराबवाडी, कुरुळी, चिंचोशी, निमगाव, जऊळके बु., खरपुडी बु., वाकी खु.
4) ए. एन. मुल्ला – नाणेकरवाडी, भोसे, दावडी, रेटवडी
5) एस. डी. थोरात – वासुली, सावरदरी, वराळे, म्हाळुंगे, कान्हेवाडी तर्फे चाकण, अहिरे, हेद्रुज, गडद, पाळु, मेदनकरवाडी, शिंदे, सांगुर्डी, करंजविहिरे, शिवे
6) जी. पी. शिंदे – गोलेगाव, रासे, धानोरे, केळगाव, खरपुडी खु., विऱ्हाम, औदर, मोई, कोयाळी तर्फे चाकण, मरकळ, चऱ्होली खु., वाफगाव
7) जीवन कोकणे – कान्हेवाडी बु., चिंचबाईवाडी, पूर, तुकईवाडी, मोहकल, वाकळवाडी, गोसासी, काळूस, कमान, खरोशी, टोकावडे, भोरगिरी
8) बाळकृष्ण कळमकर – टाकळकरवाडी, वरची भाबुंरवाडी, येणिये बु., वांद्रा, औंढे, वाजवणे, कुडे खु., कळमोडी, आंबोली, घोटवडी