बेलवाडीतील शाही विवाह सोहळ्याची हवाई चर्चा
लासुर्णे (वार्ताहर) – बेलवाडी (ता. इंदापूर) येथे चक्क लग्नाचे वऱ्हाड हेलिकॉप्टरने आल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधले. खेडेगावात एखाद्या मंत्र्याची सभा किंवा उपस्थितीलाच हेलिकॉप्टर आल्याचे पाहिले होते. परंतु लग्नमंडपात नवरी मुलगी आल्याने गावकऱ्यांनी कुतूहल व्यक्त केले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू झाली.
विवाह सोहळ्यात प्रत्येकाची हौस नावीन्यपूर्ण असते. तसेच या सोहळ्याला वेगळीच उंची प्राप्त होते. बेलवाडी येथील छत्रपती सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतिलाल जामदार यांचा मुलगा अक्षय व बिटरगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील शिवाजीराव पाटील यांची मुलगी स्नेहल यांचा विवाहसोहळा रविवारी (दि.1) हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयात झाला.
या लग्नसोहळ्यासाठी बिटरगावच्या शिवाजीराव पाटील यांनी आपल्या लाडक्या मुलीचे वऱ्हाड थेट हेलीकॉप्टरने आणल्याने बेलवाडी परिसरातील लोकांना हे अनोखे वऱ्हाड अनुभवायला मिळाले. या लग्नसोहळ्यासाठी मंत्रालयातील कामातून वेळ काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व मोहोळचे आमदार यशवंत माने हे देखील हेलिकॉप्टरने आले होते.