मुंबईतील रस्त्यांवरून धावणारी पद्मिनी टॅक्सी आता गायब होणार आहे. वाहतुकीचं साधन असलेली ही गाडी ‘काली-पिली’ म्हणूनही ओळखली जायची. मात्र आता सहा दशकांनी या टॅक्सीची चाके थांबणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील बेस्टच्या लाल डबल डेकर डिझेल बसेसची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ‘काली-पिली’ टॅक्सीची सेवा देखील बंद केली जाणार आहे.
परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रीमियर पद्मिनीची 29 ऑक्टोबर 2003 ला ताडदेव आरटीएमध्ये शेवटची नोंदणी झाली होती. शहरात टॅक्सी चालवण्यासाठीची कालमर्यादा 20 वर्षे आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईत अधिकृतपणे प्रीमियर पद्मिनी टॅक्सी चालवता येणार नाही.
नवे मॉडेल्स आणि अॅपमुळे ही काळी-पिवळी टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना दिसणार आहेत. पाच दहशकांहून अधिक काळ ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे. पद्मिनीचा टॅक्सीची सुरूवात 1964 साली झाली. 2001 साली टॅक्सीचे उत्पादन बंद करण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी शहरातील सर्वात मोठ्या टॅक्सी चालक संघटनेपैकी एक असलेल्या मुंबई टॅक्सीमॅन युनियनने सरकारकडे किमान एका काळ्या पिवळ्या टॅक्सीला संरक्षित करावं यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेला फेटाळून लावण्यात आले होते.