मंचर – येथील पिंपळगाव फाटा येथून मंचर पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतूक करणारी इको गाडी ताब्यात घेतली आहे. चालक इको गाडी सोडुन पळून गेला आहे. अंदाजे 350 किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आली.
पिंपळगाव फाटा येथे पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे, आर. एम. हिले हे वाहतूक नियमन करत असताना इको गाडी (एमएच 14 डीएक्स 4261) ही नाशिक बाजूकडून पुण्याकडे भरधाव वेगात चाललेली दिसली. गाडीच्या पाठीमागे बजरंग दलाचे कार्यकर्ते महेश थोरात, सूरज धरम, कौस्तुभ सोमवंशी, सचिन पठारे हे मोटारसायकलवर येत होते.
पोलिसांनी इको गाडी थांबविण्याचा इशारा केला असता इको गाडीवरील चालकाने गाडी शंतनु मेडिकलसमोर उभी करून चालक पळून गेला. गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये मांस आढळून आले. पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे यांनी गाडी चालकाच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस कर्मचारी चंद्रशेखर डुंबरे करीत आहे.