जुन्नर – जुन्नर ते भोसरी बससेवा आमच्याच नेतेमंडळींच्या प्रयत्नाने सुरू झाली. त्यासंदर्भात कालपासूनच समाज माध्यमातून वेगवेगळे दावे केले जात होते. आज प्रत्यक्षात तसेच चित्र समोर आले. जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरी पायथा येथे बससेवेचा शुभारंभ पिंपरी चिंचवडचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, अनिल रोकडे, अनिल मेहेर, संजय परदेशी, महेंद्र सदाकाळ, शिवा खत्री, गणेश बुट्टे, रोहिदास भोंडवे, महिलाध्यक्षा राजश्री इंगवले व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते बसला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन बसचालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड पक्ष निरीक्षक उज्वला शेवाळे, नगरसेवक भाऊ कुंभार, शहराध्यक्ष धनराज उर्फ पापा खोत, सभापती विशाल तांबे, दीपक परदेशी, सुनील
ढोबळे, वैष्णवी चतुर, हजरा इनामदार, सलमा सय्यद, अजीम तिरंदाज, अकिफ इनामदार, पुष्पा गोसावी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. जुन्नर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील विवाद टळला. पोलिसांच्या पुढाकाराने बस भोसरीच्या दिशेने रवाना झाली.
बससेवा सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा आमदार अतुल बेनके यांनी केला असून त्यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांचेकडेसातत्याने आग्रही मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला होता. बेनके यांच्या प्रयत्नांना यश येऊन बससेवा सुरू झाली. केवळ पत्र व्यवहार केल्याचे दाखवून श्रेय लाटण्यासाठी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम काही जण करत आहेत.
-अमित बेनके, युवा नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस
आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून व माझ्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा सुरू झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी देखील पीएमपीएमएल प्रशासनाकडे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. याचे कुणीही श्रेय घेत असल्यास आमची हरकत नाही.
-आशा बुचके, भाजप नेत्या