पुणे- शिवसेनेने केलेल्या धक्काबुक्कीला उत्तर देण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्ताधारी भाजपने महापालिकेत जोरदार शक्तिप्रदर्शन करत सत्कार केला. यावेळी जमलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखविल्याने सोमय्यांनाच आत घेऊन जाताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर पालिका आयुक्तांची भेट घेत सोमय्या यांनी निवेदन दिले.
त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सोमय्या यांना पालिकेच्या पायऱ्यांवर पुष्पगुच्छ देत जोरदार घोषणाबाजी केली. किरीट सोमय्या चार वाजता महापालिकेत येणार होते. त्यामुळे सकाळपासूनच पालिकेच्या मुख्य भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सोमय्यांच्या भेटीवेळी पुन्हा गोंधळ होणार नाही यासाठी सर्व खबरदारी पोलिसांनी घेतली होती. तर भाजपचे महापालिकेतील नगरसेवकांनाच पालिकेत प्रवेश देण्यात आला होता. सव्वाचारच्या सुमारास सोमय्यांचा ताफा महापालिकेत आल्यानंतर भाजप नगरसेवक त्यांच्या स्वागतासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावर उभे होते.
यावेळी सोमय्यांचा ताफा पालिकेत आला. मात्र, गाडीतून न उतरता ते पक्षाच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी अचानक बाहेर जाण्याचा निर्णय झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्यानंतर सोमय्या पक्ष कार्यालया समोर उतरले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी रस्ता अडवित घोषणाबाजी केली. तिथून सोमय्या भाजप शहराध्यक्ष मोठया संख्येने कार्यकर्ते घेऊन पालिकेकडे निघाले. या वेळी पोलिसांनी त्यांना अडविले. त्यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बॅरीकेडींग बाजूला काढत पालिकेच्या गेटला घेराव घातला. त्यानंतर गेट उघडताच 70-80 कार्यकर्ते सोमय्यांच्या सह पालिकेत घुसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या गोंधळात सोमय्यांच अडकून पडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकासह त्यांना अक्षरश: कपडयांना पकडून आतमधे आणावे लागले. तर त्याच वेळी, पायऱ्यांवर मोठा गोंधळ झाल्याने त्यांना आत जाण्यासाठी जवळपास 15 ते 20 मिनिटे लागली.
आयुक्तांकडे केली कारवाईची मागणी
सोमय्या यांनी महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचार प्रकरणी आयुक्तांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या वेळी सोमय्यांच्या सोबत खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. हे प्रकरण गंभीर असून यात शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे तातडीनं गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सोमय्या यांनी केली.
कॉंग्रेसने केले पायरीचे शुद्धीकरण
महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात आलेल्या पायरीवर कॉंग्रेस कार्यकर्ते सचिन आडेकर यांनी गोमूत्र आणि गुलाब पाणी शिंपत पायरी पुसून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तसेच सोमय्यांच्या या सत्कारामुळे महापालिकेत अत्यावश्यक कामांसाठी आलेल्या नागरिकांनाही यावेळी मनस्ताप झाला. त्याबाबतही यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. महापालिकेतील सत्कारानंतर साडेपाचच्या सुमारास सोमय्या महापालिकेतून गेल्यानंतर आडेकर कार्यकर्त्यांसह आले. यावेळी त्यांनी त्याच पायरीवर गोमूत्र शिंपडीत आंदोलन केले.
पोलिसांकडून सौम्य लाठीमार
सोमय्या हे महापालिकेत गेल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या गेटबाहेर घोषणाबाजी करत आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा समावेश होता. त्यामुळे शिवाजी रस्त्यावर काही काळ मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर गर्दी पांगवित पोलिसांनी शिवाजी रस्त्यावर वाहतूक मोकळी करून दिली.