नारायणगाव – सावकारकीच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून त्या गुन्ह्यात इतर दोन आरोपींना अटक न करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक व पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटने गुन्हा दाखल करून मंगळवारी (दि. 11) रात्री 11च्या सुमारास अटक केली आहे. त्यांना बुधवारी (दि. 12) खेड न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितली.
दरम्यान, या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील (वय 38), जिल्हा विशेष शाखाचे पोलीस शिपाई धर्मात्मा कारभारी हांडे (वय 37) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदारावर 29 ऑक्टोबर 2019 रोजी दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून त्या गुन्ह्यात इतर दोन आरोपींना अटक न करण्यासाठी अर्जुन घोडे पाटील यांनी धर्मात्मा हांडे यांच्या मदतीने 7 ऑगस्ट 2020 ला 5 लाख लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने या संदर्भात लाचेची मागणीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी (दि. 7) तक्रार दाखल केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, निरीक्षक सुनील बिले, दीपक टिळेकर, रतेश थरकार, सौरभ महाशब्दे या युनिटने शुक्रवारपासून सापळा रचला होता.
त्यानुसार शुक्रवारी तक्रारदारास नारायणगाव पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल गिरीजा येथे बोलविले भेटण्यासाठी बोलवले. त्यावेळी पोलीस शिपाई हांडेची भेट झाली. हांडेने मोबाइलवरून घोडे पाटील यांच्याशी संभाषण करून 5 लाखांची मागणी घोडे यांच्या सांगण्यावरून केलीली असल्याची खात्री झाली. त्यानंतर हांडे यांनी एका हिंगे नावाच्या मध्यस्तीमार्फत तक्रारदाराकडून लाचेच्या मागणीसाठी नारायणगाव येथे बोलविले.
यानंतर हांडे वारंवार ठिकाणे बदलून लाच घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार (दि.7), शनिवार (दि. 8), रविवार (दि. 9) करण्यात आलेल्या लाचेची पडताळणी, सापळापूर्व व सापळा कारवाई दरम्यान घडलेल्या घटना व लाचलुचपत विभागाकडून ध्वनीमुद्रित केलेले संभाषणावरून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत.