प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी व्हावा हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट – उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत

पुणे – नवीन शैक्षणिक धोरण आदर्शवत असून, प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी व्हावा हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संस्था आणि विद्यापीठांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्‍त केली.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलातील नूतन इमारतीचे उद्‌घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, प्रा. सुरेश तोडकरसह आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्ञानमय या संशोधन साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेतर्फे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण देत असून, ही बाब गौरवास्पद आहे. असे सांगत उदय सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात काही बदल सूचवित उच्च दर्जाचे शैक्षणिक धोरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्य शासनाकडे शिफारस केली आहे. या धोरणाची योग्यपणे अंमलबजावणी करण्यासाठी संस्था व विद्यापीठाची भूमिका ठरणार आहे. तसेच स्वायत्तता संस्थाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिवाळीनंतर पुण्यात सर्व कुलगुरूंची बैठक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन सामंत यांनी यावेळी दिले.

कुलगुरू डॉ. करमळकर यांनी कौशल्याभिमुख अभ्यासक्रम असलेल्या डिग्री प्लस या संकल्पनेची माहिती दिली. डॉ. एकबोटे म्हणाले, स्वायत्तता संस्थांना राज्य शासन व विद्यापीठाकडून प्रतिसाद मिळत नाही. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या प्रश्‍नांकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून एकच व्यासपीठ असावी. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने संस्थांना प्रोत्साहनचे धोरण स्वीकारावी, अशी अपेक्षा डॉ. एकबोटे यांनी यावेळी मांडली. प्रा. ज्योस्त्ना एकबोटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शामकांत देशमुख यांनी परिचर करून दिला. कल्याणी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.