जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगावमधील पाचोऱ्यात ठाकरे गटाची उद्या सभा होणार आहे. मात्र गुलाबराव पाटील यांनी ‘संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं, नाही तर मी उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेत घुसून दाखवेल,’ असे म्हंटले होते. या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता ठाकरे गटाने देखील गुलाबराव पाटलांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
ठाकरे गटाने आंदोलन करत गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसून दाखवावं, असे म्हंटले आहे. इतकेच काय तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा आणि 51 हजार रुपयांचं बक्षीस घेऊन जा, असे म्हणत धनादेश या आंदोलनात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवला. गुलाबराव पाटील यांच्या नावाने हा धनादेश लिहिला आहे. आता हे चॅलेंज गुलाबराव पाटील स्वीकारणार का? हे पाहावे लागणार आहे.
“सभेत घुसून दाखवण्याची भाषा हे गुलाबराव पाटील बोलून दाखवतात. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सभेत घुसून दाखवावं. ते परत कसे जातील हे शिवसैनिक पाहतील. गद्दार ठाकरे यांची शिवसेना सोडून गेले आहेत. खरे शिवसैनिक जागेवरच आहेत. शिवसैनिकांना गुलाबराव पाटील यांनी शहाणपण शिकवू नये,” असा इशारा ठाकरे गटाचे कार्यकर्ता गजानन मालपुरे यांनी दिला आहे.
दरम्यान, जळगावमध्ये ठाकरे गटाची सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत जळगावात पोहोचले होते. यावेळी त्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यासर्व घडामोडींमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे जळगावमधील सभा होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे.