पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शून्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळांचे मैदान आदी ठिकाणी झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास बुकींच्या भाड्यात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
महापालिकेचे शहरातील विविध भागात सभागृह, प्रेक्षागृह, खेळाचे मैदान आहेत. नागरिक, संघटना, संस्था, मंडळे, कंपनीच्या विविध कार्यक्रमासाठी सभागृहे, प्रेक्षागृहे, मैदाने भाड्याने घेतात. संबंधित मालमत्ता भाड्याने घेतल्यानंतर झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास भाड्यात 10 टक्के सलवत देण्याची योजना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सुरू केली होती. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे.
कार्यक्रमाची माहिती प्रदर्शित करण्यासाठी प्लॅस्टिक, फ्लेक्स पोस्टर्स, चिन्हे यांचा वापर करू नये. कापड, ताग, कागद या इको-फ्रेंडली सामग्रीवर सर्व पोस्टर्स व चिन्हे छापावीत. सजावटसाठी प्लॅस्टिकची फुले वापरू नयेत. फुट ऑपरेटेड सॅनिटायझर मशीन प्रवेशद्वार व इतर आवश्यक ठिकाणी ठेवाव्यात. दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेशासाठी रम्प व व्हील चेअरची सुविधा असावी.
कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांच्या नोंदणीकरिता लॅपटॉप, टॅबचा वापर करावा. नेमटॅग व सहभागी प्रतिनिधी यांची नावे दर्शविण्यासाठी कार्डबोर्ड, ज्यूट, कापडाचा वापर करावा. भेट देण्यासाठी प्लास्टीक, थर्माकोल, फोम याचा वापर न करता स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छाग्रह याचा लोगो वापरून कापड, ज्यूट यापासून बनविलेल्या वस्तू, रोपे, स्टीलचे वस्तू, कापडी मास्क आदी वस्तूंचा वापर करण्यात यावा. कार्यक्रम पत्रिका, कागदपत्रे, प्रकाशन, निमंत्रण यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
उरलेले अन्न वाया घालवू नये
ओल्या कचऱ्यासाठी हिरवी व सुका कचरा, यासाठी निळी डस्टबीन सहज दिसतील अशा ठिकाणी ठेवावीत. अन्न वाया जाणार नाही, याकरिता आयोजकांनी आश्रम व स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करून उरलेले अन्न द्यावे. महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था असावी. महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड गुंडाळण्यासाठी वेस्टपेपर, सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी वेस्ट लेबलचे लाल रंगाचे डस्टबीन ठेवावेत. स्वच्छतागृहांमध्ये स्पर्श न होईल अशा प्रकारे सेन्सर साबण डिस्पेंसर आणि सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन असावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा
पाण्याच्या वापराकरीता प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करू नये. पिण्यासाठी काचेच्या किंवा स्टीलच्या ग्लास किंवा बाटलीचा वापर करावा. प्लॅस्टिकचे कटलरी, कप, प्लेट यांचा वापर करू नये. बायोडिग्रेडेबल पर्यावरणपूरक कटलरी, कप, प्लेटचा वापर करावा. कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बुकलेट, पॅम्प्लेट, माहितीपत्रकाचा वापर न करता वेबसाईट, व्हाटस ऍप, सादरीकरण, ई-मेल किंवा क्यूआर कोडचा वापर करावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात बाहेरील खाद्यपदार्थ व पेय आदींचा वापर करू नये.