हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi )आज 11,360 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी तेलंगणा (Telangana) राज्यात पोहोचले आहेत, परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांनी सर्वच कार्यक्रमांकडे पाठ फिरवली असून मोदींच्या स्वागताला देखील के.सी.आर (CM KCR) यांच्याकडून अनुपस्थिती दर्शवण्यात आली आहे. अशावेळी राज्यपाल डॉ.तमिलीसाई सौंदराराजन आणि इतर मान्यवरांकडून मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा-
पंतप्रधान मोदींनी हैदराबादमध्ये सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला (Vande Bharat train) झेंडा दाखवला. ही देशातील 13वी वंदे भारत ट्रेन असून ही ट्रेन हैदराबाद ते तिरुपती अशी जोडली गेली आहे. ज्यामुळे हैदराबाद आणि तिरुपती या दोन्ही शहरातील अंतर साडे तीन तासापेक्षा कमी होणार आहे. ज्याचा फायदा विशेषतः यात्रेकरूंना होणार आहे.
बीबीनगर एम्सचे भूमिपूजन-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एम्स बिबीनगरचे भूमिपूजन करत पायाभरणी केली आहे. यावेळी त्यांनी पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पासोबतच इतर प्रकल्पांचेही भूमिपूजन केले आहे.