पुणे – नवीन शैक्षणिक धोरण 2020 मुळे शिक्षणाच्या क्षेत्रात भविष्य काळात झपाट्याने बदल होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करावे लागेल. लर्न, अनलर्न, री-लर्न अशी त्रिसूत्री स्वीकारल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
प्रोग्रसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे आणि भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. जोत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर, प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले…
“भविष्यातील आव्हाने ओळखूनच देशात नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. ते विस्तार, सर्वसमावेशक आणि उत्तमता या त्रिसूत्रीवर आधारीत असून त्यासोबत रोजगारक्षमता हा मुद्दा त्यात समाविष्ट आहे. महाविद्यालये केवळ पदव्याच देणारी सेंटर्स बनता कामा नयेत. त्यातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञानही मिळायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. 21 व्या शतकात नव्या पिढीसमोर कालसुसंगत राहण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्या जगभरात तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सातत्याने नव्या आव्हानांचा अभ्यास करून त्यानुसार शिक्षणाच्या क्षेत्रात कालानुरूप बदल करावे लागतील. अन्यथा शिक्षण पद्धत कालबाह्य व निरुपयोगी ठरेल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. तर, डॉ. एकबोटे यांनी मांडलेले विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी आभार मानले.
शिक्षण क्षेत्रात नावीन्याकडे कल वाढत असताना त्यासाठी आवश्यक सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. मूल्यशिक्षणासोबत अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात असल्याने विविध क्षेत्रांत मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. शासन, विद्यापीठाने महाविद्यालयांना स्वायत्तता दिली असली, तरी अभ्यासक्रम राबविण्याबाबतची मुभा देण्यासाठी पायातल्या बेड्याही काढून टाकायला हव्यात, असे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे म्हणाले.
“प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ देशासाठी दीपस्तंभासारखी
रोजगाराचे प्रश्न समोर उभे असताना शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगारक्षमता महत्त्वाची आहे. हे करण्यासाठी महाविद्यालयांचे ऍक्रिडेशन आणि अभ्यासक्रमासाठी स्वायत्तता यात समन्वय साधून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणता येईल. नव्या काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवला आहे. नव्या काळातील प्रवाह लक्षात घेऊन पुढे जाणारी ही संस्था देशाच्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये दीपस्तंभासारखे काम करणारी आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.