बॉलीवुड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने लग्नानंतर बच्चन कुटुंबामध्ये एक घट्ट नाते निर्माण केले आहे. ती उत्कृष्ट अभिनयाबरोबरच पत्नी, सून आणि आईची भूमिकाही योग्य पद्धतीने पार पाडत आहे. याची प्रचिती एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सासू जया बच्चन यांचं भाषण ऐकल्यानंतर येते. यावेळी ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळले.
बच्चन फॅमिली म्हणजे एकाच घरात अभिनय क्षेत्रातील सगळे आयकॉन. मात्र, नंतर भारतीय पद्धतीनुसार तिने स्वत:चे नाव ऐश्वर्या राय-बच्चन असे लावायला सुरुवात केली. नंतरच्या काळात कान्स फेस्टिव्हलला रेड कार्पेटवर वॉक करणारी ऐश्वर्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरली.
लोकप्रिय अभिनेत्री असूनदेखील ऐश्वर्या तिच्या कुटुंबातील जबाबदाऱ्याही नीट पार पाडते. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर तिचे संगोपन करण्यासाठी ऐश्वर्याने थोड्या काळासाठी चित्रपट संन्यास घेतला होता. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात जया बच्चन यांनी ऐश्वर्याबद्दल काढलेल्या उद्दगारांमुळे ऐश्वर्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर गाजत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर अवॉर्डस सोहळ्यातील असून जया बच्चन यांनी मंचावर ऐश्वर्याचे गोड कौतुक केले.
आज मी अशा एका गोड मुलीची सासू होत आहे जिच्याकडे सगळे संस्कार आहेत. तिच्याकडे गोड हास्य आहे. आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. “लव्ह यू’, असे जया बच्चन या पुरस्कार सोहळ्यात म्हणाल्या. जे ऐकून ऐश्वर्याला रडू आले. विशेष म्हणजे त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर त्यांची लेक श्वेता बच्चन नंदा हिलादेखील रडू आले.