तळेगाव ढमढेरे -येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिसरात अजूनही रुग्ण सापडण्याची शक्यता आहे म्हणून हा परिसर शासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी भयभीत न होता आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. प्रज्ञा घोरपडे व करोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तलाठी डी. एस. भराटे यांनी ग्रामस्थांना केले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील एका ज्येष्ठ महिलेचा करोनामुळे शुक्रवारी (ता.8) पुण्यात उपचार घेताना मृत्यू झाला असून, तिच्या घरातील 3 सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे आणि बाधित रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
करोनाबाधित मृत महिलेवर सुरुवातीला गावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे व त्यांचे कर्मचारी आणि बाधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य अशा एकूण 20 जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन करून त्यांच्या घशातील द्रव्य तपासणीसाठी पुण्यात पाठविले होते.
संबंधित करोनाबाधित रुग्ण हे ज्या ठिकाणी राहतात तो परिसर अतिशय दाट लोकवस्ती असून, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिसांनी गावातील सर्व रस्ते बंद केले आहेत. आरोग्य विभागाने परिसरातील सर्व्हे सुरू केला आहे. तर ग्रामपंचायतीने गावातील परिसर फवारणी करून विशेष खबरदारी घेतली आहे.
शनिवारी रात्री उशिरा 20 जणांचा अहवाल आला असून, त्यामध्ये मृत महिलेच्या घरातील एक करोनाबाधित व इतर 19 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी मृत महिलेच्या घरातील दोघांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असल्याने मृत महिलेसह तिघे असे चौघेजण एकाच कुटुंबातील करोना पॉझिटिव्ह आहेत.
-डॉ. प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी तळेगाव ढमढेरे