रस्ता अडकला रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत ; वासुंदे ते मांडवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे
टाकळी ढोकेश्वर – टाकळी ढोकेश्वर ते साकुरकडे जाणारा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावर वासुंदे ते मांडवे दरम्यान वाहतूक वाढल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डेच पडल्याने हा रस्ता दुरुस्तीसह रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्यावरील वासुंदे ते मांडवे रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, अरूंद रस्ता, रस्त्यावर दुरुस्ती करीता टाकलेली खडी तीन ते चार महिन्यांपासुन पडुन आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणात वाढ होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
साकुर ग्रामीण रूग्णालय, खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात या परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी याच रस्त्याचा वापर करतात. शिर्डी, नाशिक, पळशीचे ऐतिहासिक विठ्ठल मंदिर या धार्मिक तीर्थक्षेत्र ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशी या मार्गाचा वापर जवळचा मार्ग म्हणून अवलंब करतात.पुणे, नगर व नाशिक या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, नाशिकसाठी मोठ्या प्रमाणावर बस व खाजगी वाहतूक या रस्त्यावरून सुरू आहे.
संगमनेर तालुक्यामधील युटेक, राहुरी व पारनेर साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करताही याच मार्गाचा अवलंब केला जातो. संगमनेर, प्रवरानगर, पारनेर, राहुरी कृषी विद्यापीठ या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी याच रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावरील मांडवे घाटात एक अत्यंत अवघड वळण आहे. मालवाहतुकीच्या गाड्यांसाठी हे वळण अवघड मानले जाते. या वळणावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याही वळणाचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
अचानक रास्ता रोकोचा इशारा
वासुंदे ते मांडवे, खडकवाडी रस्त्यावर गेली तीन चार महिन्यापासुन दुरुस्तीसाठी खडी टाकलेली आहे. ही खडी काही प्रमाणात रस्त्यावर आल्याने रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे दुरूस्तीचे काम त्वरीत व्हावे, अन्यथा मांडवे खडकवाडी परिसरातील ग्रामस्थांसमवेत नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अचानक रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खडकवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक इंद्रभान ढोकळे यांनी दिला आहे.