तोपनहेगन – बाल्टिक समुद्रातून जाणाऱ्या वायूवाहिनीतून होत असलेल्या गळतीमागे घातपाताचे कारण आहे, असा गंभीर आरोप स्वीडनने केला आहे. या गॅस पाईप लाईनची तपासणी केल्यानंतरच्या प्राथमिक अंदाजात स्वीडनने हा दावा केला आहे. प्रत्यक्ष पाईपलाईनच्या तपासणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गळतीमागे घातपात असल्याचा संशय अधिक दाट होऊ लागला आहे. तसा पुरावा मिळाला असल्याचे स्वीडनने म्हटले आहे.
नॉर्ड स्ट्रीम-1 आणि नॉर्ड स्ट्रीम-2 या दोन पाईपलाईनमदून गळती होऊ लागल्याचे गेल्या आठवड्यात उघड झाले. त्यानंतर त्याची प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली. त्यातून काही घातपात करूनच या पाईप लाईनचे मोठे नुकसान केले गेल्याचे आढळून आल्याचे स्वीडीश सिक्युरिटी सर्व्हिसने म्हटले आहे.
या पाईपलाईनमधून जाणाऱ्या गॅसमुळे समुद्राच्या तळाशी स्फोट झाल्याचे स्वीडन आणि डेन्मार्कच्या निदर्शनास आले होते. हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. मात्र घातपाताच्या स्वरुपाबाबत सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र जेथून गळती झाली होती, तेथे समुद्राच्या तळाशी काही अवजारे आढळून आली आहेत.
आता या गॅस पाईपलाईनचा वापर तात्पुरता थांबवला गेला आहे. रशियातून जर्मनीला नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी ही पाईपलाईन सुरु करण्यात आली होती.