Entertainment : अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi adarkar) आणि अभिनेता पियुष रानडे (Piyush ranade) यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मराठी कलाविश्वात या जोडीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नाबाबत नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. यातच आता एका मुलाखतीमध्ये सुरुचीने पियुष आणि तिच्या नात्याविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सुरुची म्हणाली की, “मी फार खुश आहे. माझा आनंद मी शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. हा क्षण म्हणजे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. माझं एका चांगल्या व्यक्तीसोबत लग्न झालं यातच मी खूप आनंदी आहे. तो खूप काळजी घेणारा, भावनिक व्यक्ती आहे. मी पियुषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने मी स्वत:ला फार भाग्यवान समजते.” लग्नाबाबत सुरुची आणि पियुषने कमालीची गुप्तता बाळगली होती. अचानकच त्यांनी लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांना अचंबित केले. यावरही तिने प्रतिक्रिया दिली.
“सगळ्या गोष्टींमध्ये प्रायव्हसी जपणं, त्या खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. माझं व्यक्तिमत्वचं तसं आहे. त्यामुळे मी आमच्या नात्याविषयी सुद्धा कोणाला कळू दिलं नाही. लग्न सुद्धा कुटुंबियांच्या उपस्थितीत खासगी पद्धतीने झालं”, असंही तिने यावेळी सांगितलं. दरम्यान, सुरुची अडारकरने बुधवारी 6 डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या फोटोला अभिनेत्रीने “आनंददायी दिवस… PS आय लव्ह यू” असं कॅप्शन दिलं होतं.
सुरुचीला ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. नुकतेच तिने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही काम केले होते. तर पियुष रानडे सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.