पिंपरी – सुकामेव्याचा घाऊक बाजार पुन्हा वधारला असून मिठाई, चॉकलेटपेक्षा सुकामेव्याला यंदा चांगली मागणी आहे. गेली आठ महिने मंदी अनुभवलेल्या सुकामेवा बाजारातील काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुका यांचे दर स्थिर आहेत.
बहुतांशी कॉपोरेट कंपन्या, आस्थापना आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत सुकामेवा भेट म्हणून देत असतात. त्यामुळे ही घाऊक विक्री सुकामेवा व्यापारी व मिठाईच्या दुकानांना वर्षभराचे चलन देणारी असते. व्यावसायिक, उद्योजक, कंत्राटदार आपले व्यावसायिक संबंध जोपासण्यासाठी गिफ्ट देतात.
अधिक काळ टिकाऊ आणि आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या सुका मेव्याला नेहमीच मागणी असते. अनेक जणांकडून फळे किंवा सुकामेवा यांना प्राधान्य मिळाले आहे. त्यातच या भेटवस्तू खराब होत नाहीत, मात्र यंदा करोना काळात या भेटवस्तूंवर देखील संक्रात आली आहे.
यंदा स्वच्छता व आरोग्याचा विचार करता प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या सुकामेवा खाण्यावर सर्वसामान्य ग्राहकांनी देखील भर दिला आहे. ग्राहकांनी प्राधान्य दिल्याने दसऱ्यानंतर सुकामेव्याला चांगला उठाव आला असल्याचे चित्र आहे. नफ्याची जास्त चिंता न करता व्यावसायिक स्वस्त माल देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
- सुकामेवा दर प्रतिकिलो
– काजू 550
– बदाम 690 -800
– पिस्ता 1000 – 1200
– मनुका – 440 ते 800
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर
मंदीनंतर ग्राहकांकडून सुकामेव्याला प्रतिसाद मिळावा, याकरिता शहरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी अनेक ऑफर जाहीर केल्या आहेत. यामध्ये दोन सुकामेव्यांचा अधार् किलोचा पॅक 500 रुपयांना, तर ठराविक सुकामेव्याची टोकरी 800 रुपयांना उपलब्ध असल्याचे फलक दुकानांबाहेर झळकत आहेत.