याला (थायलंड)- थायलंडमध्ये संशयित इस्लामी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या जोरदार चकमकीनंतर किमान 15 जण ठर झाले. थायलंडमधील दक्षिणेकडील याला प्रांतात ही घटना घडली. मंगळवारी रात्री दहशत्वाद्यांनी याल प्रांतातील दोन तपास नाक्यांवर हल्ला केला. तेथील सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
या भागात सुरक्षा दलांची वाहने पोहोचू नयेत, म्हणून रस्त्यांवर खिळे टाकून ठेवले होते. दहशतवाद्यांनी काही ठिकाणी बॉम्ब पेरून ठेवले असल्याचीही शक्यता आहे. मलेशियाच्या सीमेलगतच्या जिल्ह्याला स्वायत्तता मिळण्याच्या मागणीसाठी हा हिंसाचार केला गेला होता, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
अतिदक्षिणेकडील तीन प्रांतांमध्ये मलाय- मुस्लिम दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे आणि या भागातील दहशतवादी कारवायांमध्ये आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. मात्र येथील दहशतवादी कारवायांबाबत आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांनी अद्याप विशेष दखल घेतलेली नाही. या भागांमध्ये पोलिस आणि लष्कराने मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे.
मात्र कट्टर उजव्या विचारसरणीचे गट आणि स्थानिक नागरिक एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत असतात. काही खेड्यांमध्ये स्थानिक नागरिकांना सुरक्षा दलांनी शस्त्रे पुरवून आत्मरक्षणासाठी सिद्ध केले आहे. याशिवाय गावांच्या रक्षणासाठी टेहळणी आणि गस्त घालण्याची जबाबदारीही सोपवली आहे.