बारामती – प्रत्येक खेळाडूला पराभव पण स्वीकारावा लागतो. त्यावेळेस खचू नका तर खिलाडूवृत्तीने तुम्हाला यश मिळणारच, असे प्रतिपादन जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार व आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर रवी वंजारी यांनी केले. ऑल इंडिया स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू, प्रशिक्षक यांना स्पोर्ट डायमंड ऍवॉर्ड व विद्यार्थ्यांना स्टुडंन्ट्स स्पोर्ट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
“हलगी’ फेम गायिका राधा खुडे, ऑल इंडिया फेडरेशन कर्नाटक राज्य अध्यक्ष गजेंद्र ठाकूर, आपुलकी फौंडेशनचे राज्य अध्यक्ष आप्पासाहेब मारकड, फेडरेशनचे राज्य अध्यक्ष आशिष डोईफोडे, कुस्ती निवेदक प्रशांत भागवत, अप्पासाहेब देवकाते, विशाल हंडबर, करण कुचेकर, ओंकार खुडे उपस्थित होते.
पोलीस क्षेत्रात असून सुद्धा जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय प्रवास वंजारी यांनी केला आहे. फेडरेशनचे राज्य अध्यक्ष आशिष डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गायिका राधा खुडे यांनी गीतीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. प्रशांत भागवत यांनी आभार मानले.