मधेपुरा – करोना विषाणूच्या संसर्गावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून सध्या देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र, यात अनेकजण अजूनही करोना लस घेण्यास धजावत नाही. यामागे लसीविषयीच्या अफवा आणि गैरसमजही कारणीभूत आहेत. मात्र, बिहारमध्ये एका आजोबांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 11 वेळा करोना लसीचे डोस घेतल्याचे समोर आले. यानंतर आता संबंधीत 84 वर्षीय आजोबांविरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आला आहे.
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील उदकिशुनगंज उपविभागांतर्गत पुरैनी पोलीस स्टेशनच्या ओराई गावातील रहिवासी ब्रह्मदेव मंडल यांना करोना लसीचा तब्बल 12वा डोस घेण्यासाठी आले असताना पकडण्यात आले. चौकशी केली असता या आजोबांनी स्वतःच आतापर्यंत 11 लसीचे डोस घेतल्याचे सांगितले. ब्रम्हदेव मंडल यांनी लसीचे इतके डोस कसे घेतले हे शोधण्यासाठी आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणी मधेपुरा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.