बेल्हे – समर्थ गुरुकुलातील समर्थ शेळके व सार्थक आहेर यांनी तयार केलेल्या अनलिमिटेड जनरेशन ऑफ इलक्ट्रिसिटी फ्रॉम मुव्हिंग व्हेईकल्स ऑन नॅशनल हायवे प्रकल्पास बक्षीस मिळाले.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (ता. जुन्नर) या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील समर्थ शेळके व सार्थक आहेर या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनलिमिटेड जनरेशन ऑफ इलक्ट्रिसिटी फ्रॉम मुव्हिंग व्हेईकल्स ऑन नॅशनल हायवे या प्रकल्पास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने नुकतीच जिज्ञासा-2023 राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अपारंपरिक साधनांद्वारे राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहनांपासून अमर्यादित वीज निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत “सेव्ह इलक्ट्रिसिटी, सेव्ह नेशन’ असा संदेश या प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी दिल्याचे समजते.
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, पाणी यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीज निर्मिती केली जाऊ शकते.
त्याचप्रमाणे या तंत्राचा वापर करून आपण भरधाव वाहणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वेगाचा वापर करून द्रुतगती मार्गावर असलेले सीसीटीव्ही सर्किट, पोल लाईट यासाठी वीज निर्मिती करू शकतो. ताशी 60 किमी पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चाकांमधील हवेच्या दाबाचा वापर जरून वीज निर्मिती केली जाते, तसेच स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी याचा वापर होतो.
या प्रकल्पाचा उपयोग द्रुतगती, राष्ट्रीय महामार्ग, रस्ता दुभाजकावर स्ट्रीट लाईट, टोल प्लाझा,वाहन चार्जिंग पॉईंट, पोलीस स्टेशन, सिग्नल्स, आपत्कालीन विभाग इत्यादी ठिकाणी केला जाऊ शकतो. या विद्यार्थ्यांना प्राचार्य सतीश कुऱ्हे, पर्यवेक्षक एच. पी. नरसुडे, आयटीआयचे विलास सोनवणे, प्रा. निर्मल कोठारी यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, तसेच सर्व प्राचार्य यांनी समर्थ व सार्थकचे अभिनंदन केले.