ठाणे- ठाण्यातील वर्तकनगर येथील लिटल फ्लॉवर शाळेत विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून वर्गातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेत गोंधळ घातला. यावेळी शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी सकाळी घडला. पालकांनी असे आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गोंधळ घातला जात आहे.
आम्ही दर महिना फी भरतो. पण कधी तरी उशीर होतो त्यातही शाळा प्रशासनाकडून दंड आकारला जातो, ऑनलाईन फी भरलेली शाळेला मान्य नाही, शाळेत जर विद्यार्थी मराठीत बोलले तरी ५० रुपये दंड, मुलींनी शाळेत टिकली लावली तरी ५० रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना फी भरण्यास उशीर झाला तर तुमची या शाळेत शिकण्याची लायकी नाही तुम्ही मराठी शाळेत शिका अशी भाषा शाळेच्या शिक्षकांकडून आणि मुख्यध्यापकांकडून वापरली जात असल्याचा आरोप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त पालकांकडून शाळा प्रशासनाला धारेवर धरत या प्रकरणी जाब विचारला. पालक आणि शिक्षकांमध्ये झालेल्या वादामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना युवा सेनेचे नेते पूर्वेस सरनाईक यांनी शाळा प्रशासनाची भेट घेत पालकांच्या आरोपावर जाब विचारला.