Stock Market Closing On 22 December 2023: या आठवड्यात प्रचंड चढउतार पाहिल्यानंतर, शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. आजच्या व्यवहारात आयटी आणि वाहन शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये आजही खरेदी झाली. बाजार बीएसई सेन्सेक्स 242 अंकांच्या उसळीसह 71,106 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांच्या उसळीसह 21,331 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात, बँकिंग शेअर्स आणि त्याचा निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. निफ्टी आयटी 800 च्या वाढीसह बंद झाला आहे. तर ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही वाढ झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्येही चांगली सुधारणा झाली. सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 16 शेअर वाढीसह आणि 14 शेअर तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअरपैकी 39 शेअर्स वाढीसह आणि 11 तोट्यासह बंद झाले.
गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली –
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 356.53 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 354.25 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.28 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.