जुन्नर -किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आणि जुन्नर शहरातील मुख्य चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी (दि. 22) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री यांच्या उपस्थितीत होणार असून सोहळ्याला शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अतुल बेनके व माजी नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य स्मारकामुळे ऐतिहासिक जुन्नर शहराच्या वैभवामध्ये भर पडणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन या स्मारकाचे अनावरण करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री विश्वजित कदम, नागरी विकास मंत्री प्राजक्त तनपुरे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,
खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी आमदार शरद सोनवणे, बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, “विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके उपस्थित राहणार आहेत. यावेळी शहरातून रथावर शिवदेखावे असलेली शोभायात्रा काढणार आहे.
जुन्नर नगरपालिकेने 55 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या स्मारक अनावरणप्रसंगी लेझर शो, आतषबाजी, रोषणाई, ठिकठिकाणी कमानी आदींची तयारी सुरू आहे. महाराजांना मानवंदना देण्यासाठी महिलांचे ढोल पथक आहे. यावेळी माजी नगरसेवक दीपेश परदेशी, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, अविन फुलपगार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत, विकी गोसावी, चेतन भोईर उपस्थित होते.
विकासकामांचे प्रतीकात्मक भूमिपूजन
या सोहळ्याच्यावेळी लाइट ऍण्ड साऊंड शो, फायर शो, व्याख्यानांचे नियोजन केले आहे. माणिकडोह येथील नव्याने पूर्ण केलेले वाइल्ड लाइफ दवाखान्याचे तसेच नगरपालिकेचे नवीन गेस्ट हाऊस, ऑडिटोरियमचा भूमिपूजन समारंभ व जुन्नर तालुक्यात सुमारे 125 कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रतीकात्मक भूमिपूजन कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे.