रांजणगाव गणपती – श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थानच्या वतीने अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त पहाटे अभिषेक, 12 वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील
यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व गणेश भक्त स्वप्नील गायकवाड व अनिल देशमुख यांच्यातर्फे 1001 कलिंगडाचा महानैवेद्य व भावेश कामदार यांच्या वतीने 501 डझन केळींचा महानैवेद्य करण्यात आला. गणेश भक्त राजेंद्र भोगे यांच्या वतीने पाण्याचे 50 बॉक्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ऍड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे व देवस्थान कर्मचारी, पुजारी, मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस
निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण मंदिरामध्ये सॅनिटायझरची फवारणी केलेली असून भाविकांना मास्क बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वापर करूनच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात आहे.
विघ्नहर मंदिरात आंब्यांची आरास
श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर मंदिरात पहाटे 4 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, विश्वस्त आनंदराव मांडे, श्रीराम पंडित यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून मंदिर भाविकांना दर्शानासाठी खुले
करण्यात आले. मंदिरामध्ये अंगारक चतुर्थीनिमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त सुरेंद्र कुलथे, डॉ. राजेंद्र आव्हाड, जुन्नरचे सहायक निबंधक सचिन सरसंपकर, भरत लेंडे, आनंदराव मांडे यांना मिळाला.
श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक गोविंद खिल्लारी, विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, उद्योजक हेमंत राजमाने, ओझर नं-1 च्या सरपंच मथुरा कवडे, नं-2 च्या सरपंच तारामती कर्डक यांची उपस्थित होते.