नाशिक – जगभरातील पर्यटकांची रेलचेल असलेला नाशिकचा ब्रॅंड म्हणजे “सुला वाईन्स’. याच सुला विनयार्ड कंपनीला राज्य उत्पादक शुल्क मंत्र्यांनी नोटिस पाठवली असून 116 कोटींचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटिसला सुला विनयार्डस कंपनीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी 2018 साली देखील अशाच एका नोटिस विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्य सरकारने कारवाईला स्थगिती दिली होती.
राज्य उत्पादक शुल्क मंत्र्यांनी महाराष्ट्र बिअर आणि वाईन उत्पादन नियम 1966 नुसार सुला विनयार्ड कंपनीला नोटीस बजावली आहे. इतर राज्यातून वाईन मिश्रण आणून राज्यात वाईन उत्पादित केल्याचा ठपका ठेवत त्याबाबत व्याजसह कर लावण्यात येऊन 116 कोटी रुपये अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुला विनयार्ड कंपनीला अशीच नोटीस सन 2018 मध्येही देण्यात आली होती. मात्र, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं राज्य सरकारनं स्थगिती दिली होती.
आता पुन्हा एकदा सन 2018 मध्ये उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दिलेली अंतरिम स्थगिती उठवित थकबाकी वसुलीची नोटीस बजवण्यात आली आहे. महाराष्ट्र निर्मित बिअर आणि वाईन नियम, 1966 अंतर्गत, कस्टम सीमा ओलांडून किंवा इतर राज्यांमधून आणलेल्या वाइनचे मिश्रण करुन महाराष्ट्रात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या वाईनवर उत्पादन शुल्क वसूल केला जातो. तो करण्यायोग्य आहे या आधारावर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.