महापौरांना स्थायीच्या निवडीची घाई : सभापतींनी नाकारली सही
नगर – महापालिकेच्या स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य निवड व निवृत्त आठ सदस्यांच्या प्रस्तावावर स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनी अजूनही स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे चर्चा करण्यासाठी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्थायी समितीतील सदस्य निवडीबाबत आयुक्तांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला नगरसचिव एस.बी. तडवी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, सचिन जाधव, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. मात्र या बैठकीला बसपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे गटनेत्यांनी पाठ फिरविली. स्थायी समिती सदस्य निवृत्ती व नवीन सदस्य निवडीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून तयार करून स्थायी समिती सभापती शेख यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर अजूनही शेख यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे स्थायी समितीतील नवीन सदस्य निवड थांबलेली आहे. ही निवड करण्यासाठीचा प्रशासकीय मार्ग शोधण्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे प्रशासकीय पेच सोडविण्यासाठी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
31 जानेवारी रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात निवृत्त सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या निवृत्त सदस्यांमध्ये संध्या पवार (कॉंग्रेस), विद्या खैरे, ज्ञानेश्वर येवले, गणेश कवडे (शिवसेना), दीपाली बारस्कर, अविनाश घुले, शोभा बोरकर (राष्ट्रवादी), मनोज कोतकर (भाजप) यांचा समावेश होते. या संदर्भातील पत्र सभापतींच्या स्वाक्षरी विनाच 4 मार्चला महापौरांकडे देण्यात आले होते. निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीने महासभेकडे प्रस्ताव पाठवला जातो. यानंतर उर्वरित आठ सदस्यांच्या निवडी होते.
या निवडीसाठी निवृत्त झालेल्या सदस्यांच्या पक्षांचा गटनेता आपल्या पक्षांतील सदस्यांच्या नावाची शिफारस करतात. यानंतर त्यावर महासभेत मंजूरी देवून निवड केली जाते. प्रभाग क्रमांक सहा अ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव या निवडून आल्याने भाजपचे संख्याबळ एकने वाढणार आहे. तर शिवसेनेचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. त्यामुळे महापौर वाकळे यांनी जोर धरला असून स्थायी सदस्यांची लवकरात लवकर निवड करण्यासाठी महासभा बोलावणार आहेत.
मात्र निवृत्त सदस्यांचाच ठरावावर सभापती शेख यांनी अद्यापही सही न केल्याने या निवडीला एक प्रकारे ब्रेकच लागला आहे. महापालिका आयुक्तांचा या प्रशासकीय पेच प्रसंगावर निर्णय झाल्यानंतरच मी स्थायी समितीच्या नवीन सदस्य निवडी संदर्भातील प्रशासनाचे पत्र मिळाल्यानंतर तात्काळ महासभा बोलावली जाईल असे महापौर वाकळे यांनी सांगितले.