फनगर – एसटी महामंडळाची 56 वी वार्षिक क्रीडा स्पर्धा 22 ते 24 जानेवारी दरम्यान नगर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण येथे पार पडणार असून राज्यातील सर्व विभागातील 31 जानेवारी 2019 रोजी चाळीस वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास 800 खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रक विजय गीते यांनी दिली.
21 जानेवारी रोजी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता संघ व्यवस्थापकांची क्रीडा स्पर्धेबाबत बैठक घेतली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी होणार असून खेळाडूंनी स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना स्पर्धेचे ठिकाण सोडून जाता येणार नाही. या स्पर्धेमध्ये धावणे, उंच उडी, भाला फेक, गोळा फेक, शारीरिक सौष्ठव, कुस्ती, कबड्डी इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला असून स्पर्धेमध्ये भाग घेऊन ऐनवेळी काहीतरी कारण सांगून भाग न घेणारे खेळाडू आणल्यास संबंधित संघ व्यवस्थापकावर कारवाई करण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पुरुष व स्त्रिया स्पर्धकांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वैयक्तिक खेळासाठी दिलेल्या स्टॅंडर्ड चे पालन न करणारी व कबड्डीचे संघ सुमार दर्जाचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. कबड्डी स्पर्धेसाठी 9 पेक्षा जास्त खेळाडू नेता येणार नसून कुस्ती स्पर्धेसाठी एका वजन गटातील दोन्ही खेळाडू नेता येणार आहेत. स्पर्धेसाठी विभागात असलेल्या नवीन खेळाडू कर्मचारी यांचा स्पर्धेसाठी शोध घेऊन संधी दिली जाणार आहे. तर अपंग कर्मचाऱ्यांसाठी वेगळी क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. रीले साठी वेगळ्या खेळाडू न घेता निवड झालेल्या खेळाडू मधूनच रीले संघाची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रर राज्य कुस्तीगीर परिषदेने कळवल्या नुसार कुस्तीच्या वजन गटांमध्ये बदल करण्यात आले असून त्यानुसार खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यावर्षी 57 किलोपर्यंत आणि 79 पेक्षा जास्त किलो वजन गटापर्यंत कुस्ती स्पर्धा घेतली जाणार आहे. महिला खेळाडूंसाठी 100, 200 मीटर धावणे, थाली फेक, गोळा फेक लांब उडी कबड्डी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.